'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे'
पहिली-दुसरी च्या बालभारती तील ही कविता! आताशा संपूर्ण आठवतही नाही. पण लहानपणी मात्र ही कविता आम्ही सारे वर्गमित्र मिळून एकसुरात म्हणत असू. काय दिवस होते यार ते! सकाळी आई मस्त तयारी करून देणार, नाश्त्याचा डबा घेऊन मग आम्ही बाबांसोबत घरातून बाहेर पडणार, डुलत-डुलत आमची स्वारी वर्गात पोहोचणार; दिवसभर थोडा अभ्यास, थोडं शिकणं, थोड्या खोड्या आणि भरपुर धमाल!! घरी परतल्यावर लगेच मैदान गाठायच आणि मग लगोरी, सोन-साखळी, आबा-धुबी हे खेळ.. सायंकाळी थकून-भागून घरी आलो की अभ्यास, जेवण आणि मग झोप! हा कार्यक्रम शालांत परीक्षा होई पर्यंत निरंतर चालू होता. पण नंतर मात्र हे सगळ आपोआपच बंद झालं..
एक दीर्घ उसासा टाकत मी कॉफ़ी चा कप हातात घेतला आणि घराच्या गैलरीत आलो. फार विहंगम दृश्य दिसत होतं. दोन पतंग आभाळी उडत होते. जणू वाऱ्याशी स्पर्धा करत होते. नुकताच सूर्य पलीकडच्या डोंगराआड जाउन लपला होता. आकाशात विविध रंग विखुरलेले होते. पश्चिमेची थंड हवा मनाला प्रसन्न करत होती. फार दिवसांनंतर मी अशी प्रसन्नता अनुभवली. माझे केस वाऱ्यावर भिरभिरत होते. पुन्हा माझ मनं गत आयुष्यात रमून गेलं...
ना काही चिंता, ना कसला ताण! जीवनाचा आनंद मुक्त हातांनी लुटा आणि मौज करा, बस एवढंच ठाउक होतं तेव्हा.. आणि मग पैशांच्या मागे धावता-धावता कधी तारुण्य संपलं व कधी म्हातारपणाची चाहुल लागली कळलं सुद्धा नाही. जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांनी जसं काही मला बांधून ठेवलं होतं. या गैलरीतुन दिसणाऱ्या देखाव्यासाठी मी हे घर विकत घेतलं, पण प्रत्यक्षात मी इथे हा देखावा पहायला किती वेळा आलो?? एकदाही नाही!!! आज या सगळ्या गोष्टी आठवायच कारण म्हणजे आज सदा चा वाढदिवस! सदाशिव माझा बालपणीचा जिवलग मित्र. आमच्या घराजवळच रहायचा. अगदी घट्ट मैत्री आमची! तसा तो अभ्यासात हुशारच होता पण त्याला प्रवासाचं, नव-नविन जागा पहाण्याचं भारी वेड! कुठे सहलीसाठी जायचं असेल तर विचारून तर पहा..एखाद्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती असायची त्याच्याजवळ. पुढे मग त्याने शिक्षण सोडलं आणि एका यात्रा कंपनीत गाइड म्हणून कामाला लागला. खुप मेहनत केली, खस्ता खाल्या. आज त्याची स्वत:च्या मालकीची एक यात्रा कंपनी असून १३ गाड्या आहेत. अजूनही, म्हणजे या वयातही तो आवर्जुन एखाद्या सहलीला जातो. त्याच्या कर्मचारी-वर्गाला स्वत:चे अनुभव सांगतो. ग्राहकांना हवी ती माहिती पुरवतो. एकंदरीत त्याचं मस्त चाललं आहे...
क्षणभर मला त्याचा हेवा वाटला.. अरेच्चा! पण मी ही काही वाईट जीवन नाही जगलोय. चांगला प्रथम श्रेणीत इंजिनियर झालो, मोठ्या पगाराची नोकरी आहे, छानशी बायको मिळाली, या उच्चभ्रू ठिकाणी मी घर विकत घेतलं, चिक्कार पैसा कमावला, दोन मुले कर्तबगार झाली.. सर्व जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पार पाडल्या. एक यशस्वी व्यक्तिला आणखी काय हवं? काहीच नाही.. पण मग मला त्याचा हेवा वाटण्याच कारण काय?
तेवढ्यात त्या पतंगांतली एक पतंग कटली आणि वाऱ्यासोबत आपल्याच लहरीत भिरभिरत निघाली. दूसरी अभिमानाने आकाशात उंचावर उडत होती परंतु ती स्वच्छंदी उडू शकत नव्हती. कारण तिच्या दोऱ्याचं एक टोक दुसऱ्याच्याच हातात होतं..!