उन्हाळ्याच्या सुट्या संपता संपत नव्हत्या. मी फारच कंटाळलो होतो. न जाणे शाळा पुन्हा कधी चालु होईल?! इयत्ता ९वी-अ..नवी पुस्तके, नव्या वह्या आणि नवा गणवेश. नुसत्या विचारानेच मन आनंदून गेलं. पण त्याला अजुन बराच अवकाश होता. माझं मन पुन्हा खट्टू झालं. तस पहिलं तर पप्पा म्हणत होते कि आजी-आजोबांकडे जाऊन ये काही दिवस..पण मलाच जायचे नव्हते. मुळात मला आमच्या आजोळी जाणं इतकं आवडत नसे..आणि हे पप्पांना ही ठाऊक होतं. पण मी त्यांच्या समोर असं प्रत्यक्ष बोलणं टाळत असे. तसा आमचा गाव फारच सुंदर व रमणीय आहे. थंड हवामान, शांतता आणि गावाबाहेरून वाहणारी नदी.. मज्जा यायची. पप्पा आणि मी तासन-तास नदीत डुंबत असू. एकदा विचार आला ही कि जावूया आजी-आजोबांना भेटायला. पण मीच स्वत:ला आवरले.
कारण आजीला संधिवाताचा त्रास होता..तेही २० वर्षांपासून. सुरुवातीची काही वर्षे आजी चालु-फिरू शकत असे. पण नंतर तिचा त्रास वाढला आणि कुबड्याही साथ देईनाश्या झाल्या. तिचे चालणे-फिरणे बंद झाले ते कायमचेच. आजीचे सगळे प्रात:विधी मग बिछान्यावरच असायचे. त्यात घरी त्यांची काळजी घेणारं आजोबांशिवाय कुणीच नव्हत. सगळी मुले, म्हणजे माझे पप्पा आणि काका हे नोकरीनुसार बाहेरगावी स्थायिक झाले होते. त्यामुळे आजीची सर्व जबाबदारी पडली ती माझ्या आजोबांच्या खांद्यावर.. तसे आजोबा ही वार्धक्यामुळे वरचे वर आजारीच असत. पण आजीच्या देखभालीत त्यांनी तसूभरही कमी ठेवली नाही. आजीची स्वच्छता, दोघांची औषधी, स्वयंपाक आणि घराबाहेरची कामे..सर्व अगदी व्यवस्थित पार पडे. आजोबांना यामुळे खूप थकवा जाणवे आणि हे आजीला दिसत होत, जाणवत होत. याचमुळे कि काय, आधी हसरी व प्रेमळ असणारी माझी आजी चिड-चिडी झाली होती. छोट्या-छोट्या शुल्लक कारणावरून ती आरडा-ओरड करत असे, आजोबांशी भांडत असे. मला आजीचा फार राग येई. याच कारणामुळे मी आजोळी जाण्यास सहसा उत्सुक नसे.
एरवी आमच्या घरी कुणाचे-ना-कुणाचे येणे-जाणे असायचे. पण या सुट्ट्यांमध्ये कोण येणार?! माझे घराजवळचे मित्र ही गावी गेले होते. म्हणून मला जास्तच एकाकी वाटत होत. इतक्यात दारावरची बेल वाजली. आज शेजारचे कुटुंब गावाहून परतणार होतं. "तेजस आला असेल बघ..", आई म्हणाली. मी धावतच जाऊन दार उघडले. पाहतो तर काय..पोस्टमन होता. त्याला पाहताच मला तर रागच आला. मी तसाच माघारी फिरलो आणि आईला सांगितलं,
"पोस्टमन आहे. तूच बघ."
"अरे हा काय उद्धटपणा चालवला आहेस तू? त्यांना घरात तर बोलव.." आई माझ्याकडे डोळे वटारून पाहत होती. पण मी कुठला थांबतोय तिथे हे ऐकायला?! मी पाय आपटतच खुर्चीत जावून बसलो. तार आली होती..आजोबांची. आजीची तब्येत फार गंभीर झाली होती. तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केल होतं. आम्हाला तातडीने निघावं लागणार होतं..
चला, तेवढच आपल फिरणं होईल, मनात विचार आला. आम्ही लागलीच गावी जायला निघालो. रेल्वेसाठी तालुक्याला जावं लागत असे. तिथे गेल्यावर कळलं कि गाडी दोन तास उशीराने धावत आहे. झालं! इथेही वाट पाहणेच नशिबी होतं माझ्या. मला स्वत:वरच राग येत होता. पण स्टेशन वर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.
"आजोबांना फोन करून येतो कि आपल्याला उशीर होईल." पप्पा म्हणाले. मी ही निघालो त्यांच्या बरोबर. त्या काळी आज सारखे मोबाईल नव्हते. STD करावा लागे. पप्पांनी हॉस्पिटल मध्ये फोन लावला. पलीकडून आजोबांचा आवाज आला, "तुझी आई देवाघरी गेली बाळ." आजी-आजोबा पप्पांना 'बाळ' म्हणत असत.
"आजी गेली..", पप्पा तार स्वरात बोलले. बर झालं, आजोबांचा त्रास तर कमी झाला..मला वाटल. आई-पप्पा सांगत होते कि फार भयंकर दुखणं असतं संधिवाताच. मला क्षणभर आजीसाठी फार वाईट वाटलं. आपण दोन दिवस जरी आजारी पडलो आणि पलंगावर पडून रहाव लागलं, तरी किती कंटाळा येतो आपल्याला?! आणि आजी मागच्या वीस वर्षांपासून त्या बिछान्यावरच होती. खाणं-पिणं, बसणं, झोपणं, प्रात:विधी..सगळ-सगळ बिछान्यावर! किती त्रास होत असेल आजीला.. आणि त्यामुळे किती कष्ट पडत असतील आजोबांना?!! खरच, चांगलच झालं कि आजी गेली. आजी त्या जाचातून तर सुटली. आता आजोबांना ही आरामात राहता येईल. नाही म्हटल तरी आजोबांना आजीचा त्रास हा होताच. मी वरकरणी जरी दाखवत नसलो, तरी आतून मात्र मला आजोबांसाठी बरच वाटत होतं.
आम्ही गावी पोहोचेपर्यंत आजीला घरी आणण्यात आल होत. घरात शिरलो आणि मला एक अनपेक्षित दृश्य दिसलं. आजोबा आजीच्या पार्थिवाजवळ बसले होते..आणि धाय मोकलून रडत होते. मला वाटलच होत कि आजोबांना दु:ख होईल. पण इथे तर त्यांच रडणं पराकोटीला गेलं होतं. माझे सगळे काका त्यांच्या जवळ बसले होते आणि त्यांचे सांत्वन करत होते. पण आजोबा काही शांत होत नव्हते. ते सारखे आजीला उठवण्याचा प्रयत्न करत होते..जणू काही ती फक्त गाढ झोपेत आहे. पप्पा त्यांना समजवण्याच्या सुरात म्हणाले, "अहो, का रडताय तुम्ही एवढे? उलट तिला त्रासातून सुटका मिळाली असा विचार करा.."
"अरे पण मी आता या घरात एकटा काय करू? कशी ही असली तरी माझी सोबतीण होती ती..माझ्या सुख-दु:खाची साथीदार होती. मागची चाळीस वर्षे ऐकतोय मी तिची कटकट..सहन करतोय तिची चिड-चिड..आता तर सवयच झाली आहे या सर्वांची. ती अशी कशी मला अर्ध्या वाटेत सोडून जाऊ शकते? अगं ऐकते आहेस का तू? उठ बर आता. बघ तुझे सगळे मुलं आले आहेत तुला पहायला..." आजीकडे पाहत बोलले आजोबा.
त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात सागरच उतरला. कदाचित लग्न म्हणजे काय हे समजण्या इतपत वय असेल वा नसेलही माझं, पण 'सोबत' आणि 'साथ' या शब्दांच वजन मात्र नक्कीच पेलवण्यासारखं नव्हतं मला...